सुरीले - रामकृष्ण बाक्रे, पुस्तक समीक्षण
नमस्कार मंडळी! आज मी तुमच्यासमोर आणखी एका संगीताविषयीच्या पुस्तकाचे समीक्षण घेऊन येत आहे. हे पुस्तक म्हणजे ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार श्री. रामकृष्ण बाक्रे ह्यांच्या वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये छापून आलेल्या काही लेखांचे संकलन. काही असे कलाकार ज्यांनी अभिजात संगीताला खूप मोठे योगदान दिले त्यांच्याविषयीची हे लेख आहेत.
ह्या संकलनातला पहिला लेख आहे 'प्रतिबाळकृष्ण'. प्रतिबाळकृष्ण म्हणजे काय? तर पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे असे काही शिष्य ज्यांची गायकी बुवांच्या गायकीच्या अतिशय जवळची होती आणि ज्यांची रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत. पण अशा लेखाशी जरूर काय? ग्वाल्हेर घराण्याचे गाणे महाराष्ट्रात रुजविण्याचे मोठे कार्य बुवांनी केले. त्यामुळे त्यांच्या घराण्याच्या अनुयायांना तसेच शास्त्रीय संगीताच्याअभ्यासकांना ते कसे गात असावेत ह्याचे कुतूहल असणे साहजिकच! परंतु दुर्दैवाने त्यांचे एकही रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. पण मग त्यांचे काही ज्येष्ठ शिष्य ज्यांची गायकी त्यांच्या गायकीच्या जवळची होती त्यांची रेकॉर्डिंग्स ऐकल्याने ही उणीव काही प्रमाणात का होईना भरून निघेल असा एक विचार ह्या लेखात मांडला आहे आणि अशा शिष्यांविषयी लिहिले आहे. मला स्वतःला हा विचार आणि लेख इतका चोख वाटला कारण खांसाहेब अल्लादिया खान ह्या जयपूर-अत्रौली गायकीच्या थोर आद्यप्रवर्तकाचे आत्मकथन वाचल्यावर मलाही "त्यांचे गाणे कसे बरे असेल?" ह्याविषयी खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. आणि तेव्हा मीही "त्यांचे शिष्य कोण, त्यांची रेकॉर्डिंग्स आहेत का?" इत्यादींचा शोध घेतला. त्यातूनच माझ्या गेल्या काही पोस्ट्स जन्म झाला. आणि केसरबाई किंवा मोगुबाई ह्यांसारख्या शिष्यांची रेकॉर्डिंग्स ऐकल्यावर मनाचे थोडेफार समाधानही झाले. त्यामुळे प्रतिबाळकृष्ण ह्या लेखाचा उद्देश मला अगदी मनापासून लक्षात आला आणि त्यामुळे हा लेख मनाला खूप भावला.पुस्तकातला पुढचा लेख आहे पं. वि. दि. पलुस्करांविषयीचा. अभिजात संगीतविद्या जनसामान्यांपर्यंत पोहोचावी ह्यासाठी त्यांनी केलेले कार्य शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश लोकांना माहितीच असते. आता गायनासारख्या कलेचे विद्यापीठीकरण योग्य की अयोग्य? उपयोगी की निरुपयोगी? हे वादाचे मुद्दे आहेत. परंतु, ह्या लेखातून पं. पलुस्करांची ह्या चळवळीमागची विचारसरणी, तळमळ आणि आपल्या ह्या विचाराला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी केलेले नियोजन, कृती आणि त्याग ह्यांविषयी आणखी कल्पना आली. त्यातून खूप काही शिकायला मिळालेच परंतु आपला एखादा जगावेगळा विचार, ज्यावर आपला विश्वास आहे, त्याला कृतीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणाही मिळाली.
उरलेल्या लेखांमध्ये गोविंदराव टेंम्ब्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि त्यांची बोलणारी हार्मोनियम, बडे गुलाम अली खांचे 'larger than life' गायन आणि व्यक्तिमत्त्व, पं. यशवंतबुवा जोशींचा खडतर गायनप्रवास आणि त्यातून मार्ग काढत काढत त्यांनी गाठलेले यशाचे शिखर, पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले या आजच्या जगाला विसर पडलेल्या गायनकुशल कलाकाराची कहाणी हे सर्व खूप चित्तवेधक आहे. तसेच ह्या लेखांमुळे ह्या गायकांची युट्यूब रेकॉर्डिंग्स माझ्याकडून मुद्दाम ऐकली गेली. आणि आपल्याच अंगणात पुरलेला एक एखादा खजिनाच हाती लागल्यासारखे वाटले. आज आपल्याला युट्युबद्वारे हे सगळे ज्ञान अगदी खरोखरीच हाताच्या बोटांवर उपलब्ध आहे ही भाग्याचीच गोष्ट नाही का?
नारायणराव व्यासांना वि. दि. पलुस्करांचे शिष्यत्व मिळण्यामागची गोष्ट आणि आपल्या ह्या प्रयोगशील गुरूप्रमाणेच गायनक्षेत्रात नवनवीन प्रयोग करून त्याद्वारे आपले गायन लोकांपर्यंत पोचवण्याची त्यांची हुनर अगदी वाचनीय आहे. कुमार गंधर्वांचे प्रत्यक्षात गंधर्वाला साजेसे राहणीमान आणि गाणे, पं. भीमसेन जोशींनी गायनासाठी केलेले भीमसेनासारखेच विशाल त्याग आणि प्रयत्न, मुळात नट असलेल्या गोड गळ्याच्या पं. फिरोझ दस्तूरांचे सवाई गंधर्वांकडून गाणे शिकणे, सगळेच कसे अद्भुत! कोणाच्याही गाण्याच्या फर्माईशीला कधीही नकार द्यायला संकोचणाऱ्या माणिक वर्मा, आपल्या कष्टांतून आणि विचारातून एक वेगळी गायनशैली निर्माण करणारे रसराज जसराज आणि आपल्या सरळ आणि शिस्तबद्ध स्वभावासारख्याच सरळ व निर्मळ गायनाने रसिकांचे मन जिंकणाऱ्या मालिनीताई! ह्या सगळ्यांबद्दल वाचून लहानपणी ऐकलेल्या स्वर्गीय मैफिलींच्या आठवणी जाग्या झाल्या.
छोटे, ओघवत्या भाषेत लिहिलेले आणि उत्कंठावर्धक लेख असणारे हे पुस्तक अभिजात संगीताविषयी आवड असलेल्या प्रत्येक माणसाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे आणि ते अमेझॉनवर सहज उपलब्ध आहे हेही आपले भाग्यच. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचा!
Comments
Post a Comment