ग्रंथसमीक्षा: सुरश्री

ह्या मालिकेच्या मागच्या भागामध्ये आपण जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अल्लादिया खान ह्यांच्या  आत्मचरित्राची समीक्षा पाहिली. खानसाहेबांनी गायनाची तालीम आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार घेतली होती. त्यामुळे सुरुवातीला  आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच गायनाची तालीम देण्याकडे त्यांचा जास्त भर होता. कुटुंबाच्या बाहेर इतर कोणालाही तालीम देण्याबाबत ते साशंक होते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची क्लिष्ट गायकी पेलू शकणारा आवाज आणि ती आत्मसात करायला लागणारी जिद्द बाळगणारी माणसे  मिळणे कर्मकठीण होते

पण अशी एक शिष्या त्यांना लाभली, आचार्या सुरश्री केसरबाई केरकर ह्यांच्या रूपातखरेतर  खांसाहेबांकडून तालीम सुरु करण्याआधी सुरश्रींनी काही निष्णांत गुरूंकडून शास्त्रीय गायकीचे धडे घेतले होते. एक चांगली गायिका म्हणून त्यांचे नावही झालेले होते. पण एका मैफिलीत आलेल्या अपयशाने त्यांना इतके अपमानित झाल्यासारखे वाटले की त्यांनी खांसाहेबांकडून साग्रसंगीत तालीम घ्यायचा दृढनिश्चय केला. बऱ्याच खटपटींनंतर आणि फार मोठ्या दक्षिणेच्या मोबदल्यात खांसाहेबही तालमीला तयार झाले. माझ्याकडून कमीत कमी १० वर्षे तालीम घ्यावी लागेल आणि ह्या काळात मैफिलींमध्ये गाता येणार नाही, ह्या आणि अशा इतरही काही अटी खानसाहेबांनी घातल्या. तेव्हा केसरबाई २७ वर्षांच्या होत्या. एखाद्या नावाजलेल्या कलाकारासाठी एवढ्या मोठ्या कालखंडासाठी  असे लोकांच्या नजरेआड जाणे हा केवढा मोठा निर्णय असेल? पण आपल्या घरंदाज गायकी शिकण्याच्या तृष्णेपोटी तो त्यांनी घेतला आणि निभावून नेला. आणि मग त्यांनी पुन्हा जेव्हा जाहीर मैफिली करायला सुरवात केली तेव्हा त्यांचे हे अभूतपूर्व गाणे ऐकून लोक अचंबित झाले. खानसाहेबांनी वार्धक्यामुळे जाहीररित्या गाणे केव्हाच सोडले होते, त्यामुळे त्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकलेली माणसे तेव्हा फारच कमी होती. त्यामुळे केसरबाईंचे हे नवे गाणे लोकांना इतके आवडले की भारतभरातून त्यांना बोलावणी येऊ लागली. कित्येक दिग्गज लोकांनी त्यांच्या गाण्याचे कौतुक केले. त्यांना सुरश्री आणि आचार्या अशा पदव्यांनी आणि अनेक सम्मानांनी गौरविले. इतकेच काय, तर नासाच्या व्हॉयेजर ह्या अंतराळयानासोबत अंतराळात पाठवलेल्या जगभरातील प्रसिद्ध गायकांच्या गाण्यांच्या  रेकॉर्डमध्ये त्यांच्या गाण्यांचाही समावेश केला गेला. 


नक्की कसे होते हे जादुई गाणे? खानसाहेबांनी ही जादू कशी घडवून आणली? आपले घरंदाज गायकी आत्मसात करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केसरबाईंना कोणत्या दिव्यांतून जावे लागले? केसरबाईंच्या आयुष्याबद्दलच्या ह्या आणि अशा कित्येक पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे बंधू बाबुराव केरकर ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक जरूर वाचा. ह्यातले केसरबाईंच्याविषयी पुल आणि इतर अनेक नामवंत व्यक्तींनी लिहिलेले लेखही त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर आणखी प्रकाश टाकतात. 

केसरबाईंच्या मृत्यूनंतर मोगूबाईंनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचे प्रत्युत्तर म्हणून बाबुरावांनी हे पुस्तक लिहिले  असे ते म्हणतात. त्यामुळे शेवटची काही सदरे ह्या टीकेला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहेत. ही सदरे मात्र मला आवडली नाहीत. कारण इतक्या मोठ्या कलाकाराची कला आणि त्यांच्या आयुष्याची कहाणीच इतकी अद्भुत आहे की ती वाचल्यानंतर आणखी कोणत्याच समर्थनाची गरज वाटत नाही.  शिवाय अशाप्रकारचे लिखाण नियतकालिके-वर्तमानपत्रे ह्यांसारख्या ठिकाणी जास्त उचित वाटते कारण लोकांना त्या-त्या वेळी घडणाऱ्या घटनांचा संदर्भ लागू शकतो. एखादे पुस्तक अनेक वर्षे वाचले जाऊ शकते. इतक्या काळानंतर काही घटनांचे गांभीर्य तितकेसे राहिलेले नसते किंवा वाचकांना भूतकाळातल्या कित्येक गोष्टींचे संदर्भही लागू शकत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे लिखाण पुस्तकात असण्याचा काहीच उपयोग नाही. तेव्हा ही सदरे वाचकांनी वगळली तरी चालतील अशी आहेत. 

ह्या पुस्तकाची फक्त ए-कॉपी मला मिळाली. त्याची लिंक तुमच्यासाठी इथे देत आहे. ही लिंक पीडीएफची नाही तर archive.org वर खरे पुस्तक वाचावे तसा वाचनाचा अनुभव मिळतो. 



Comments

Popular posts from this blog

In the Heart of Madhmad Sarang

पुस्तक समीक्षा: सूर-संगत, गानयोगिनी धोंडुताई कुलकर्णी