पुस्तक समीक्षा: सूर-संगत, गानयोगिनी धोंडुताई कुलकर्णी

गेल्या काही पोस्ट्समध्ये आपण जयपूर-अतरौली घराण्याच्या काही शागिर्दांच्या चरित्रांचे समीक्षण केले. घराण्याच्या अशाच एका एकनिष्ठ गायिकेच्या म्हणजेच गानयोगिनी धोंडुताई कुलकर्णी ह्यांच्या 'सूर-संगत' ह्या चरित्राची समीक्षा मी आज लिहीत आहे.

ज्या काळात सुसंस्कृत घरांमध्ये गायन-नृत्यादी कला निषिद्ध मानल्या जात, खासकरून मुली व स्त्रियांसाठी, त्या काळात धोंडुताईंच्या वडिलांनी त्यांना उत्तम प्रकारचे गाणे शिकवायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. आणि त्यांच्या ह्या धडपडीमुळेच खुद्द अल्लादिया खांसाहेब आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडून धोंडुताईंना गायनाची तालीम व मार्गदर्शन मिळाले. पुढे सुरश्री केसरबाई केरकरांच्या एकमेव शिष्या बनून त्यांच्यासारख्या शिस्तशीर आणि कडक स्वभावाच्या गुरूकडून विद्या आत्मसात करण्याचे शिवधनुष्यही त्यांनी पेलले. ह्या विद्यार्जनात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी त्यांनी लग्नदेखील केले नाही. अशाप्रकारे वर्षानुवर्षे तपश्चर्या करून मिळवलेल्या ह्या मौल्यवान विद्येचा आब राखत, ज्या काळात गायक पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागले होते, त्या काळात कोणत्याही मोहांना बळी न पडता धोंडुताईंनी जयपूर-अत्रौली घराण्याची शुद्ध गायकी जपली आणि ती आपल्या शिष्यांना दिली. 

सूर-संगत ह्या आत्मचरित्रात धोंडुताई आपले बालपण, वेगवेगळ्या शिक्षकांसोबतची तालीम, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष ह्याविषयी सांगतात. ठरवलेले लक्ष्य गाठण्यासाठी जिवापाड मेहनत घेण्याची प्रेरणा आपल्याला त्यातून मिळते. शिवाय आजच्या काळात आपल्याला अगदी सहज मिळत असलेल्या ह्या विद्येविषयी आपल्या मनात आणखी आदर निर्माण होतो आणि आपल्या पूर्वजांप्रमाणे तिची मनोभावे आराधना करून तिला काळजीपूर्वकतेने पुढच्या पिढीस सोपविण्याच्या जबाबदारीची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते.

धोंडुताईंनी ह्या पुस्तकात स्वतःच्या आणि इतर प्रसिद्ध कलाकारांच्या मैफिलींचे वेचक आणि वेधक असे अनुभव सांगितले आहेत. "गाणे कसे असावे? आदर्श गुरु कसा असावा? आदर्श शिष्य कसा असावा? रियाझ कसा करावा?" इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांवर अतिशय मौलिक असे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्याविषयीचे लेख त्यांच्याविषयीच्या आदर आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत. ते वाचून आपल्याला धोंडुताईंनी लिहिलेल्या एकेक शब्दातल्या खरेपणाची साक्ष मिळते. ह्या पुस्तकातील आणखी एक आवर्जून उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे गानसरस्वती किशोरी अमोणकरांनी घेतलेली धोंडुताईंची मुलाखत! घराण्याची गायकी शुद्धतेने जपणाऱ्या धोंडुताई आणि घराण्याच्या सीमा ओलांडून गायनाविषयीचे एक वेगळेच तत्त्वज्ञान अनुसरणाऱ्या किशोरीताई ह्यांच्यातला हा संवाद एक विलक्षण अनुभव देऊन जातो.  

प्रसिद्धीच्या कधीच मागे न लागलेल्या धोंडुताईंच्या नावाला अनेक विख्यात गायकांसारखे वलय नाही. त्यामुळे त्या मलाही आधी माहित नव्हत्या. पण जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीच्या मुळांचा शोध घेता घेता हे रत्न मला सापडले हे माझे भाग्यच. तुम्हीही हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल ह्याची मला खात्री आहे! हे पुस्तक ऍमेझॉनवर उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

In the Heart of Madhmad Sarang

ग्रंथसमीक्षा: सुरश्री